नमस्कार मी योगिनी चौक.
एक अभिनेत्री,
"महाराष्ट्राचा सुपरस्टार" या ऍक्टिंग बेस्ड रिआलिटी शो ची विजेती.
अकादमी ऑफ़ थिएटर आर्ट्स, कलीना यूनिवर्सिटी, मुंबई मधून अभिनयाचं रितसर प्रशिक्षण घेतलेली.
रुईया महाविद्यालयात युथ फेस्टिवल, झोनल, नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स मधे विविध बक्शीसे पटकावली.
आत्तापर्यंत, 5 सिनेमे, 8 व्यावसायिक नाटके, 9-10 सीरियल्स असा अनुभव पाठीशी.
सगळं आरामात चांगलं सुरु होतं. इथे मान-सन्मान होता, ऍवार्ड फंक्शन्सला बोलावणं होत होतं, तिथे परफॉर्म करत होते, दहिहंडी, दांडियाच्या सूपाऱ्या ही घेतल्या, खुप पैसे कमावले. फ्री पासेस मिळायचे, without ऑडिशन केवळ नाव ऐकून कामे ही मिळायची....
इतकं सगळं सुरळीत सुरु असताना, मी मात्र सतत स्वतःवर नाराज होते. मी जे काम करतेय तेच खरंतर मला हवंय का? की मी काही वेगळं करण्याच्या शोधात आहे? मी जे काम करतेय त्यात खरंच मला समाधान मिळतंय का? की केवळ शो बाजी होतेय? हे प्रश्न सतत मनात काहुर माजवत होते. पण मी त्यांकडेही दुर्लक्ष्य करंत होते... ऐकून न ऐकल्यासारखं.....
स्वतःच्या कामाशी कितीही प्रमाणिक राहण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्याचे विचार, दृष्टीकोन कधीकधी पटायचे नाहीत.
मी पाहत होते दारू पिउन दरुबंदिवर नाटकं होतात, नाटक सुरु असताना स्टेजवर कलाकारांना हसवणं, ऍडिशन्स घेणं, सुरु नाटकात विंगेत गप्पा मारणं, मस्ती करणं, पाहत होते, पचवत होते, एकदा दोनदा या विरोधात बोलायचं धाडसही केलं पण.... उपयोग काहीच नाही... आतून उदास व्हायचे... सीरियल मधे ही मी खुप खोटी हसले....अशा वातावरणात एडजेस्ट करावं लागत होतं... त्यात काय...सगळ्यांनाच एडजेस्ट करावं लागतं .... पण आपल्याला आयुष्यभर असचं एडजेस्ट करावं लागणार या विचारांनीच उदास असायचे.
या प्रवासात बरीच चांगली माणसेही भेटली जी आपल्या कामांशी प्रमाणिक, वेळेवर येणारी काम करून निघुन जाणारी, न कुणाच्या अद्यात न मध्यात, गोड हसणारी ही माणसे खरंच जवळ असायची तेव्हा हरुप यायचा कामाचा.... पण बाहेर पडल्यावर पुन्हा तेच प्रश्न, तुला हेच असंच काम करायचंय का? वेगळी वाट तर काही दिसत नव्हती आणि काय शोधतेय ते माझं मलाच कळंत नव्हतं....
सुपरस्टारपद जिकल्यानंतर वाटलं होतं, आता आपली गाडी सुसाट पळणार.... लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी, त्यांना मिळाली ती कामे स्वीकारली आणि पुढे गेले हे ऐकलं होतं, मी ही मिळेल ती कामे स्विकारत गेले... सुदैवाने मला माणसे चांगली भेटली पण काम स्विकारताना कधीच माझी भूमिका, त्याची खोली, त्याची लांबी, भूमिकेचं स्थान.... यांचा विचार न करता किती पैसे मिळणार याचा विचार केला. आणि केवळ प्रोडक्ट बनवत राहिले.... आणि प्रोडक्ट बनवता बनवता मी ही प्रोडक्ट बनतेय याचा कधी विचारच केला नाही.
मधला काळ तर असा गेला की, माझ्याकडे काहीही काम नव्हतं. आणि घरात बसायची सवय नाही...रोज धडपड, रोज फोनफोनी, रोज ऑडिशन्स... पुस्तकात मन रमायचं नाही, की बाहेर फिरण्यात नाही, नाटक सिनेमा पहिला की अजुनच रडू यायचं... वाटायचं आपणही काम करावं.... हळूहळू ते पाहणं ही सोडून दिलं.... घरात बसून नुसती चिडचिड वाढत होती....माझा नवरा, घरातले, माझ्या वागण्याने हैराण झाले अगदी... फ्रस्ट्रेशन वाढत चाललं होतं, नकार पचवणं अवघड होऊन बसलं होतं. माझी इतकी केविलवाणी अवस्था झाली, की मी शॉपिंग करण्यामधे आनंद शोधु लागले... सगळी सेव्हिंग संपवली, पुन्हा रडगाणं सुरु....बरं नवऱ्याचे पैसे वापरायचे नाही,स्वाभिमान आड यायचा... असं हसु करून घेतलं मी स्वतःचं..... पण मनावर कंट्रोल जमत नव्हता. काम हवं होतं, पैसा हवा होता....
खरंतर अशी परिस्थिति बऱ्याच कलाकारांवर येते पण काम मिळवण्यासाठी मी कुठल्याही आड मार्गाला गेले नाही किंवा तसा विचारहि मनात कधी आला नाही...ही मात्र जमेची बाजू ...... नाहीतर स्वैर,मनस्वी मूली कुठल्या थराला जातात... हे काही नवीन नाही....
एके दिवशी घरातल्या झोपाळ्यावर झुलत विचारात असतानाच जणु ती आर्तता, ते vibrations अवकाशात पोहचले असावेत आणि माझ्या मोबाइलवर एक मेसेज आला..
"Envision, experience and explore yourself as a performer & creative human being in "Theatre of Relevance” Residential workshop"
सुरवातीला तर दुर्लक्ष्य केलं. पैसे कुठेयेत भरायला... आणि असं वर्कशॉप वगैरे करून कामं थोडीच मिळणार आहेत.... मनातून विचार काढून टाकला.... मग आठवलं, एका नाटकाच्या दौऱ्यात वेळ असताना "अश्विनी नांदेड़कर" हिने तिच्या एका वर्कशॉपचा एक सुखद अनुभव मला सांगितला होता. तिने काही कातकरी मुलींना एकत्र जमवुन त्यांचं वर्कशॉप घेतलं होतं. सुरवातीला नावहि सांगायला लाजणाऱ्या त्या मूली वर्कशॉप च्या शेवटच्या दिवशी कशा नाचल्या, हासल्या.... इतकंच नाही तर, गावच्या बसस्टैंड पर्यंत रैली काढून बसस्टैंड मधे पथनाट्य सादर करून आल्या आणि तेहि "जिंदाबाद जिंदाबाद कातकरी मूली जिंदाबाद" हा नारा जोरजोरात लगावत!! अश्विनी तिथून निघताना त्यातील एकिने परीचं चित्र काढून "तू आमची परीताई" असा तिचा गौरव करून तिला ग्रीटिंग गिफ्ट केलं, हां अनुभव तिने मला सांगितला होता. हाच तो वर्कशॉप असावा असं मला वाटलं.
नाटकाच्या दौऱ्यात अश्विनीने एकदा तिच्या "गर्भ" नाटकातिल एक भाग परफॉर्म करून दाखवला होता. तो परफॉरमेंस बघुन तर मी मंत्रमुग्ध झाले.... 5 मिनिटांच्या त्या सादरीकरणाने माझे डोळे पाणावले.... आणि जाणीव झाली हेच मला हवंय, हेच शोधतेय मी, असंच परफॉर्म करायचंय मला.... हेच परफेक्शन शोधतेय..... तिच्या परफॉरमेंस ने माझ्यातील अभिनेत्री जागी झाली होती.... जी सत्वाच्या शोधात होती. तो "काहीतरी" चा शोध.... म्हणजे सत्व होतं, हे तेव्हा उमगलं.... 'क्या ढूंढता है मनुष्य' हे तिच्या नाटकातिल वाक्य मला हलवुन गेलं..." मै खड़ी होना चाहती हूँ, रेंगना नही चाहती... रेंगना जीवन नही.... मैं गर्भ से बाहर आना चाहती हूँ ...." ही वाक्य मला माझी वाक्य वाटली. खुप कनेक्ट झाले होते तिच्याशी.... त्या कैरेक्टरशी....
एकाच वेळी प्रेक्षक म्हणून भारावले आणि दुसरीकडे आग उत्पन्न झाली एक परफ़ॉर्मर म्हणून असं प्रभावी परफॉर्म करायची.... मी विचारलं, "कुणी शिकवलं हे तुला... कुणी लिहिलय हे इतकं प्रभावी....?" आमचे सर आहेत, ती म्हणाली. "अगं तुझ्या डोळ्यात दिसलं... तू आक्ख्या ब्रम्हांडात फिरतेएस.... ग्रहांना हात लावतेएस....त्यांना हातात घेतेएस... really i could feel it...."
तेव्हा तिने प्रोसेस सांगितली की, सर आधी तुम्हालाच नाटक उभं करायला सांगतात आणि नंतर त्यात प्राण ओततात. तिने उदाहरण दिलं की, ब्रम्हांडात ती फिरते आणि एका-एका ग्रहांला हात लावत ती सूर्याकडे पोहचते आणि तिचे डोळे दिपतात. तेव्हा सरांनी तीला जुहू चौपाटीवर नेउन खास तो मावळता सूर्य दाखवला आणि विचारलं, आता या सूर्याला पाहून तुझे डोळे दिपतात का गं...?
आता ती अलगद घागरा उचलते त्या समुद्राच्या लाटांवर पडलेल्या कवडस्यावरुन चालत सूर्यापर्यंत पोहचते आणि मग "एक टुकड़ा सूर्य" हां संवाद म्हणते.... ही प्रक्रियाच मला खुप भन्नाट वाटली.... वेगळं काही आज ऐकायला मिळालं.... कोण आहे हां दिग्दर्शक, जो सूर्य दाखवतो....मलाही भेटायचंय.... असं काम मी यापूर्वी कद्धिच केलं नव्हतं. मी आनंदात होते, मला वेगळं काही सापडलं होतं.... आता वेळ होती तीथपर्यंत पोहचण्याची....
मी पुन्हा फोन हातात घेतला, अश्विनीला फोन लावला आणि विचारलं, "हां तो तू सांगीतलेला तुझ्या सरांचाच वर्कशॉप आहे का?" पलिकडून आवाज आला, "हो योगिनी, तू जे सत्व शोधत होतीस नं, तुला इथे नक्की मिळेल...."
नाविन्याचा शोध आता संपला, आता वेळ होती कृतिचि......
- क्रमश:
No comments:
Post a Comment