
त्या एका उद्गाराचं पुढे नाटकात रूपांतर होईल, याची कुणी कधी कल्पनाही केली नव्हती आणि सरांच्या डोक्यात या हुंकारापासूनच नाटकाची प्रक्रिया सुरू ही झाली होती.
चैतन्य अभ्यास प्रक्रियेतून आल्यावर सरांनी "रंगकर्मी" हे नाटक परफॉर्म करायला सांगितलं. पुन्हा संघर्ष सुरु. कारण आत्तापर्यंत एका मागोमाग एक अशा संवादांचं नाटक असतं हेच पाहिलं होतं आणि "रंगकर्मी" हे नाटक सलग एका लेखाप्रमाणे दिसंत होतं... पुन्हा गर्भित अर्थांनी, विचारांनी भरलेलं क्लिष्ट हिंदी नाटक..... "अरे हा लेख म्हणजे काय नाटक आहे का? आणि लेख कसा परफॉर्म करणार?" काही सुचत नव्हतं. सर एक-एक टास्क कुठून शोधून आणतात याचं नवल वाटत होतं.
मात्र यावेळेस पुन्हा प्रक्रिया भिन्न होती. 4 तास संघर्ष झाल्यानंतर सरांनी पहिलंच वाक्य वाचायला सांगितलं,
"मैं कौन हूँ? क्या हूँ? इसकी मुझे अब चिंता नहीं है।" असं लेखक का म्हणंत असावा? याचे अनेक अर्थ शोधून काढले. पण मूळ अर्थ माझ्या आत दडलेलाय, (प्रत्येक परफ़ॉर्मर च्या आत दडलेलाय) हे सरांनी एका सुंदर प्रोसेसने दाखवुन दिले.
सरांनी आधी, "मैं कौन हूँ?" हे लिहायला सांगितलं.
एक व्यक्ति, लड़की, मुलगी, बहिण, बायको, सून आणि कलाकार.
मैं क्या हूँ?, अभिनेत्री, गृहिणी, लेखिका, नर्तिका.
अब इन सबकी मुझे कोई चिंता नही असं म्हणायचंय.....
आता कनव्हिक्शन कसं येईल....? या विचारांत सरांनी दिवसभर आम्हाला तसंच सोडून दिलं आणि आम्ही कनव्हीक्शनच्या शोधात.....
संध्याकाळी चैतन्य अभ्यासाची वेळ आली तेव्हा सरांनी आम्हाला एका टेकडीच्या उताराशी नेलं. निसर्गरम्य परिसर होता तो... चहुबाजूंनी झाडे, फुलझाडे, टेकडीच्या बाजूने नदीचा वाहता खळखळता प्रवाह आणि टेकडीच्या तोंडाशीच एक संथ पाण्याचा कुंड तयार झाला होता. आम्हा सर्वांना कनव्हीक्शन हवं म्हणून सरांनी त्या टेकडीच्या उतारावरुन चालायला, धावायला सांगितलं. यात कसं कनव्हिक्शन मिळणार? माझा धीर सूटत चालला होता.
धावता धावता रंगकर्मी नाटकाचे संवाद म्हणू लागलो. तिकडच्या पाना-फुलांना सांगू लागलो, मैं कौन हूँ? क्या हूँ? इसकी चिंता नही। पण म्हणजे नेमकं काय? इतक्यात सरांनी आवाज दिला...सर्वांना टेकडीच्या टोकावर उभं राहायला सांगून तिथून उताराकडे पाहायला सांगितलं आणि काय दिसतंय विचारलं....
त्या उतारावर चार पायऱ्या तयार झालेल्या दिसल्या. सर म्हणाले, त्या चार पायऱ्या म्हणजे आयुष्याचे चार टप्पे आहेत. बाल्यावस्था, कौमार्यावस्था, तारूण्यावस्था आणि वार्धक्यावस्था आणि उतार संपल्यावर पुढे जे संथ पाण्याचं कुंड दिसतंय ते मोक्षाचं कुंड आणि आता या उतारावरुन चालत जा आणि त्या मोक्षाच्या कुंडापर्यंत पोहचुन पुन्हा वर चालत या आणि आता म्हणा, मैं कौन हूँ? क्या हूँ? इसकी मुझे अब चिंता नही है।
अंगात चैतन्य संचारावं तसं झालं... मी डोळे बंद करून त्या मार्गावर चालू लागले. पहिल्या पायरीवर उतरले माझी बाल्यावस्था आठवली. त्या अवस्थेतून कौमार्यावस्था आणि त्यातून तारुण्यावस्थेत रूपांतरित होतानाची प्रक्रिया अनुभवली आणि वार्धक्यावस्थेत असल्याची कल्पना करत मोक्षाच्या तोंडाशी पोहचले.
जब विचार आपके पकड मेँ हो तभी कनव्हीक्शन आता है।
आता डोळ्यांत चमक आली होती आता ती जागा अधिक प्रफुल्लित आणि सुंदर भासू लागली.
आत्तापर्यंत लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्याने पाठ करून सादर करणं हे आणि इतकंच अनुभवंत होते. मात्र "रंगकर्मी" नाटकाची स्क्रिप्ट किंवा "मैं औरत हूँ" नाटकाची स्क्रिप्ट हातात आल्यावर "आत्मसंवाद" हे देखिल एक नाटक असतं याची जाणीव होते. केवळ संवादांच्या नाटकातून मी आत्मसंवादांच्या राज्यात फेरफटका मारुन येत होते. मंजुल सरांच्या नाटकातिल सक्षम विचारांतून आपली नाट्यसमज विकसित होते, समृद्ध होते. म्हणूनच मी ठामपणे सांगू शकते की, या नाट्य प्रवासात मी एक अभिनेत्री म्हणून माझेच माइंडसेट्स तोडतेय आणि अधिकाधिक नवनवीन विचारांनी समृद्ध होतेय.
आता तो रंगमंच 'जिवंत' दिसत होता आणि आता त्या मार्गावरून आपल्या अस्तित्वाचा शोध घेत चालताना मला माझी 'चाल' आणि 'विचार' सुसंगत वाटु लागले होते. पुन्हा परतीला निघताना, त्या मोक्षाच्या कुंडात, माझ्या आधीच्या कामाचा हलकासा प्रकाश पडलेला होता, तो प्रकाश शांतपणे त्या पाण्यावर तरंगत होता....
आणि मी मात्र सगळं मागे टाकून पुनरुज्जीवित होण्याच्या दिशेने धावत होते, वर-वर प्रगतिच्या दिशेने. मागची मोहमाया मागेच टाकून..... खऱ्या अर्थाने रंगकर्मी होण्याची ही वाटचाल... ज्ञाताकडून अज्ञाताकडे..... मोक्षापासून पुर्ननवजीवनाकडे......
क्रमशः
No comments:
Post a Comment